banner

Articles & Videos

Articles

अध्यात्मिक पालकत्व

“बाळ, थकलीस तू बस जरा”. टेकडी चढत असताना एका पाच वर्षाच्या मुलीचे बाबा तिला म्हणाले. माझ्या मनात आले, अहो बाबा, थकला आहात तुम्ही. तुमचे मूल तर फुलपाखरू. ते हवे तसे विहरू शकते. थकलेच तर त्याची जाणीव त्याला तुमच्यापेक्षा जास्त होते. आणि ते मोठमोठ्याने म्हणते, मी थकले आहे. मला बसायचं आहे. तेव्हा कदाचित तुम्ही म्हणाल, “बाळा, तुला इतक्यात कसे थकायला झाले ? ऊठ आणि चालायला सुरु कर, त्याने तुझा स्टॅमिना वाढेल, तू तर फारच अशक्त आहेस, चालण्याने तुझी भूक वाढेल आणि त्यायोगे तुझी तब्येत सुधारेल.”

मूल झालं म्हणजे ती आपली वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, असे कित्येक जणांना वाटते. आपल्या मुलाच्या मनाचा, भावनेचा, त्याच्या विचारांचा, त्याचा मूड याचा काहीच विचार पालक करत नाहीत. आपल्या मुलाला रेसमध्ये पळवायचे, त्याला सर्व बाबतीत हुशार करायचे, एवढाच विचार पालक करतात. जणू काय आपले मूल हुशार नाही, असाच समज पालक करून घेतात.

तुम्ही कधी उठायचे, कधी बसायचे, काय करायचे, असे तुम्हाला सतत कुणी सांगत राहिले, तर तुम्हाला काय वाटेल? तुमचं स्वतःच डोकंच बधिर होईल. तुम्ही काहीही न करता हातात रिमोट कंट्रोल घेऊन टीव्हीपुढे बसाल किंवा हातात माऊस घेऊन कॉम्प्युटरपुढे बसाल, होय ना? कारण स्वतः विचार करण्याची तुमची शक्तीच राहिली नसेल ना ?

मुले ही देवाघरची फुले त्यांना कुठल्याही सूचना करण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वप्नांची जाणीव करून देण्याची काही एक गरज नसते. त्यांना फक्त गरज वाटते आपल्या पालकांच्या प्रेमाची - मायेची. पालकांनी आपल्यासाठी वेळ दयावा, आपले बोलणे समजून घ्यावे, असे त्यांना वाटत असते. आपल्या मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी फक्त मार्गदर्शन करावे. त्यांना आधार दयावा. मगच आपल्या मुलात जी अगणित, देवासारखी ब्रह्मांडाएवढी जी शक्ती आहे, त्या शक्तीचा ते वापर करत राहतील. जन्मल्यापासून ते आपल्या अंगभूत शक्तीचा वापर ते करत असतातच, पण पालकांचा आधार असला, तर ते त्यांच्यात असणाऱ्या दिव्यशक्तीला जोडलेले राहतील, जग जिंकतील !

विचार करा, तुमच्या आईने किंवा वडिलांनी तुमच्या बरोबर वेळ घालविला असता, तुमच्याशी ते सतत खेळले असते, शब्दांतून, स्पर्शातून तुमच्यावर सदैव प्रेमाचा वर्षाव केला असता, तुम्हाला भावनिक आधार देऊन तुम्हाला दिलेली शब्द पाळली असती, तर तुम्हाला नाही वाटत, की आज तुम्ही जे आहात त्यापेक्षा काहीतरी, कुणीतरी वेगळे असता? तुमचे अस्तित्व वेगळे असते? स्वतःकडे पाहायची तुमची दृष्टी वेगळी असती ?

खरे तर यात पालकांची काही चूक नसतेच. ते आपल्या मुलांना असेच संस्कार, असेच प्रेम व माया देतात जी त्यांना त्यांच्या पालकांकडून मिळालेली असते. पण, कधी तरी, कोणी तरी, पिढयानपिढया चालत आलेली ही पध्दती बदलायला हवी, नाही का ?

आपण सहजपणे म्हणतो – “आमचा सोनू बघा, एकदम ‘गुड बॉय’. सगळ्यांना मदत करतो. तो मुळीच दंगा करीत नाही. एकदम शांत आहे. शाळेत तर त्याचा पहिला नंबर कधीच चुकलेला नाही. आमच्या या गुडबॉयला शाळेत ‘बेस्ट चाईल्ड ऑफ द इयर’ हे पारितोषिक मिळाले होते. खरंच मुलाच्या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत. आमचं काहीतरी पुण्य म्हणूनच इतका चांगला मुलगा आमच्या पोटी जन्मला हो !”

या ‘गुडबॉयला’ काय आवडते? त्याला दंगामस्ती करणं आवडत नसेल का? त्याला त्याच्या मर्जीनुसार काय करावे, काय करू नये याची मोकळीक दिली जाते का? आपण त्याचं मन किती मारतो? याचा कुणी विचारच करीत नाही. त्याचं बालपण आपण हिरावून घेतो आहोत, असे कुणालाच कसे वाटत नाही? आपला मुलगा शांत शांत का असतो? आपला गुडबाय म्हणाव म्हणून स्वतःला जे करायचे आहे ते करायला तो घाबरत तर नसेल ना? हे कुणी नीट समजून घेतं का?

मूल रडणं हे स्वाभाविक आहे. किंबहुना सर्व मानव जातीत निसर्गाने दिलेली ती एक देणगी आहे. रडण्यामुळे आपल्या अंतर्मनातील दुःख बाहेर पडते. मनातील राग, पश्चाताप, दुःख, एखादयाबद्दलचा मत्सर; या सर्व भावना डोळ्यांतील अश्रूंनी धुऊन जातात. रडण्यामुळे मन शुद्ध होण्यास मदत होते. मनातील राग नाहीसा होतो. परंतु आपण पालक आपल्या मुलांमधील ‘रडणे’ ही नैसर्गिक वाट त्यांच्या बालपणीच बंद करून टाकतो.

‘चूप रे’,’ उगी उगी’, ‘रडू नकोस’, ‘चांगली मुलं रडत नाहीत’, ‘तू शूर आहेस ना’, ‘मग रडतो कशाला?’, ‘अरे वेडी मुलं रडतात’, ‘अरे एवढ्या साध्या गोष्टीसाठी मुलीसारखं कोणी रडत का?’, ‘रडताना तू किती वाईट दिसतोस’, ‘रडलास तर चटका देईन’, ‘रडलास तर खोलीत कोंडून ठेवेन’; असे म्हणून आपण आपल्या मुलाचे दुःख दाबून टाकतो. अशा बळजबरीने त्याचे नकारात्मक भावना आतल्या आत राहतात. असे आतल्या आत घुसमटल्यामुळे आपल्या मुलांचे हृदय कोरडे पडते. त्याच्यातील ओलावा नाहीसा होतो. मग नैसर्गिकपणेच आपल्या आई-वडिलांबाबत त्याच्या मनात प्रेमाचा ओलावा राहत नाही. शेवटी, “आमची मुलं आमच्यावर प्रेमच करीत नाही,” असे म्हणत, पालकांवर रडण्याची वेळ येते !

खरे पालकत्व म्हणजे अशा अनैसर्गिक वागण्यातून आपण स्वतः प्रथम मुक्त होणे. आपण पालक संस्कारात (कंडिशनिंग मध्ये) अडकलेलो. इतरांनी आपल्यावर लादलेल्या विचारानुसार आपण चालत आलेलो. आपल्याला काय हवे, काय नको, हे आपण स्वतःवर लादलेल्या संस्कारांमुळे विसरून गेलो आहोत. मग आपण आपल्या मुलांवर पालकत्वाची भूमिका कशी बरे निभावणार?

तेव्हा पालकांनो, आपल्या मुलाच्या सुंदर भविष्यासाठी, प्रथम त्याच्या आनंदाचा विचार करा. हा आनंद देण्याकरिता अगोदर स्वतः मुक्त व्हा. म्हणजे मग आपण आपल्या मुलांवर खरे प्रेम, खरी माया करू शकू. केवळ या प्रेमामुळे त्यांचे जीवन सुखी होईल आणि तुमचे सुध्दा !

ज्या पालकाने लहानपणी आपल्या वडिलांकडून बेल्टने मार खाल्लेला असेल, असे काही पालक आपल्या मुलांबाबतही असे वागतात. सुदैवाने काही पालक असेही आहेत, की त्यांनी आपल्या वडिलांकडून जे भोगले ते आपल्या मुलांच्याबाबतीत टाळतात. त्यांना प्रेम देतात, माया करतात. परंतु दुर्दैवाने असे लोक फारच कमी आहेत.

रेस चालू आहे. स्पर्धा वाढत आहे. ऍडमिशन मिळणार नाही. म्हणून काय तीन – चार वर्षाच्या आपल्या मुलाला सतत अभ्यासाच्या चक्रातच गुंतवायचे? त्यांना खेळू द्यायचेच नाही? मुलांचा असा आनंद हिरावण्याने व त्यांना सतत अभ्यासात गुंतवल्याने काहींचे डोके बधीर होणार नाही का? तेव्हा पालकांनो, आपल्या मुलांना फुलू द्या, उमलू द्या, खेळू द्या, बागडू द्या, त्यांना त्यांच्या कलेने अभ्यास करू द्या. स्वतःला काय हवे, काय काय नको, हे त्यांचे त्यांना ठरवू द्या, यासाठीचे मार्गदर्शन हवे तर त्यांना अवश्य द्या पण त्यांना रुचेल अशा प्रेमळ भावनेने करा. मग पाहा, आपल्या मुलात जगातील या रेस ची गरजच भासणार नाही. तो स्वतःच एक रेस तयार करेल. त्याला फक्त प्रेम द्या, मायेचा ऊबदार स्पर्श द्या. त्याला तुमचे कान, तुमची नजर द्या ! त्याच्या तोंडून साक्षात परमेश्वरच बोलतो ते ऐका.

काही पालकांची वागणूक पाहा – ‘लहान मुलांना काय कळते?’, ‘ते लहान आहेत, जाऊ द्या’, ‘अरे गप मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस’, ‘अरे गाढवा’, ‘हे आमचं दिवटा पहा’ असे व अशा प्रकारचे अगणित वाक्ये आपल्या मुलांकरिता रोजचे झाले आहेत. पालकांच्या अश्या वाक्यांनी मुलांच्या मनावर कसा परिणाम होत असेल, याचा विचार आपण कधी करणार?

जो स्वतःवर प्रेम करायला विसरला, 'संस्कार' या विश्वामध्ये राहून, इतरांनी दिलेले विचार घेऊन, या विश्वात वावरायला लागला, त्याला म्हणतात 'पर्सनॅलिटी'. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. पालकांनी व समाजाने आपल्याला स्वीकारावं म्हणून तो एक मुखवटा असतो, जो घेऊन आपण वावरतो. आपलं सुरक्षा कवच आहे ते! पण या मुखवट्याच्या आत, खोल खाली, कुठेतरी कोपऱ्यात दडलेलो, लपलेलो, घाबरलेललो असतो... आपण स्वतः. तेव्हा पालकानो या 'स्व' ला शोधा, त्याला कुशीत घ्या, त्याला गोंजारा व तुमचीच ऊब द्या. प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका, मग तुम्हीही व्हाल अध्यात्मिक पालक !

पण या स्व ला शोधायचे कसे? अर्थात आजूबाजूच्या गर्जना बंद करा. टीव्ही, जाहिराती, रेडिओ, बडबड, गॉसिप्स, वर्तमानपत्रातील निगेटिव्ह बातम्या सर्व बंद करा. कारण हेच जग आपण रोज आत्मसात करत असतो. तेव्हा पालकांनो, शांत रहा, ध्यान करा. आपल्या अंतर्मनातील गर्जना ऐका, त्याकडे लक्ष द्या, म्हणजे त्याचा तुमच्या मनातून हळूहळू निचरा होईल. स्वतःहुन हे करणे अवघड वाटत असले तर सुरुवातीला या बाबतीत जे तज्ञ असतात त्यांची मदत घ्या. नंतर स्वतःच जबाबदारी घ्या. भरपूर व्यायाम करा, पहाटे ऊठा, ब्रह्ममुहूर्तावर ती ऊर्जा आपल्या आतमध्ये घ्या, प्राणायाम करा, निसर्गात फिरायला जाऊन निसर्गाची परतफेड करा, सात्विक आहार घ्या, स्वतःकरिता वेळ ठेवा, सुंदर संगीत ऐका, चांगले कपडे कपाटात खास समारंभासाठी न ठेवता स्वतःकरिता वापरा, येता जाता आरशात पाहून स्वतःचे कौतुक करा, स्वतःला आय लव्ह यु म्हणा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. जितके प्रेम स्वतःवर कराल तितकेच मुलांना द्याल. त्यामुळे मुलांना उमलण्याकरिता तुम्ही एक आधार बनाल, त्यांना फुलायला एक प्रेरणा ठराल आणि त्यांना खुलायला एक आकाश द्याल.... !!

मानसी सोसे पुणे (dt: 08/2013)


<< back