banner

Articles & Videos

Articles

भावभावनांच्या आविष्कारातून साकारलेली पेंटिग्ज

मानसी माझ्याकडे पाहते नि हसते. अगदी मनातून नि गोड हसून म्हणते, तू माझी आई आहेस मागच्या जन्मीची. आणि अगदी खरंच, ती वागतेही त्याच लाघवीपणाने नि मलाही जाणवते की, भाची असूनही आपली मुलगीच आहे. अशी मनात शिरणारी नि खूप काही बोलणारी आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी! म्हणूनच तिच्या चित्रांमध्ये आहे गूढरम्य विचारांचे वादळ. रेकीचंही ज्ञान असणारी आणि म्हणूनच समोरच्याच्या मनापर्यंत पोहचू शकणारी. प्राणायमाचा अभ्यास करताना मनातला ॐ अनेक चित्रात उतरलाय नि त्या ॐ मध्ये आहे शांती, त्या बरोबर शांतीचा मार्गही !

स्वतःच्याच भावभावनांच्या आविष्कारातून साकारलेले तिचे पेंटिंग् पाहिले नि त्यातून मला खूप अर्थ उकलू लागले. एक पेंटिंग्ज वरून साधंच वाटणार पण त्यातील एकातून एक चौकटीतून आतपर्यंत–अगदी आत्म्यापर्यंत पोहचविणारं व त्यातून अलगद पेटत्या मेणबत्तीच्या रूपाने बाहेर पडणारा शरीरातील आत्मा तोही प्रज्वलित, तेजस्वी व भोवतालचा परिसर दिपवून टाकणारा. एक एक पापुद्रा उलगडत आपल्याला हे पेंटिंग्ज नकळत आत्म्याचा दिव्य साक्षात्कार घडवून देतं.

अजून एक पेंटींग मातेच्या गर्भातील हालचालींचे नि तिच्याच मनाच्या पडसादांचे. आपोआपच जाणवतं की , स्त्री जातीला मिळणार हे वरदान म्हणजेच एक आनंदोत्सव आहे. निर्मिती फक्त निर्मितीचाच नव्हे, तर पुननिर्मितीचा !

असंच एक पेंटींग पटकन पाहिल्यावर वाटेल की , लहान मुलाने रंगाचे फराटे मारले आहेत, पण त्यात आहे अति मानसिक दबावानंतर होणारा भावनांचा उद्रेक.

त्यातील लालभडक रंग दाखवतात जीवनातील अनावर भावनांचा उद्रेक, तर काळे रंग दाखवतात जीवनातील दुःखद व त्रासदायक घटनांचे प्रतीक. या घटनांचा क्रम वेगाने मनातून बाहेर पडत आहे. असं वाटतं, हा आपल्याच दडपलेल्या विचारांचा उद्वेग आहे - जो बाहेर पडल्यावर मनावरील दडपण कमी होईल. त्याच अर्थाचं अजून एक पेंटींग - ज्यात चेहऱ्यावर कपाळावरील भागावर लाल पट्टे आहेत - हेही आहे, क्रोधाचे प्रतीक जे चेहऱ्यावरील भावभावनांतून व्यक्त होत आहे. क्रोधाचा लालसरपणा चेहऱ्यावरही पसरला आहे.

अनेक चित्रांमधून गणपती साकारलाय अगदी सहजपणे आणि ते चित्र घेऊन जाते आपल्याला देवालयातील शांत गाभाऱ्यात. मन शांत होते नि आपोआपच परमेश्वरात तल्लीन होते. अनेक निसर्गचित्रांतून ती आपल्या आजोळीही जाऊन पोहचते. तेथील झाडं, घर नि शांत वातावरण. शहरातील धावपळीच्या जीवनात मनाला आल्हादायक व हवंहवंसं वाटणारं व आजच्या काळात दुर्मिळही झालेलं हे चित्र नक्कीच सर्वांना आवडणार, यात शंका नाही.

अनेक चित्रांतून डोळ्यांमधील भाव नजरेत भरतात. त्यात जाणवतो कधी एखादा चेहरा - शांत, समाधानी, तर एखादा मनातील जरब व्यक्त करणारा. डोळयांतील बुबुळं मध्यभागी असलेले डोळे मनातील संताप व्यक्त करतात. शंकराचे काढलेले तीन डोळे व निळसर काळ्या रंगाच्या छटेतून कागदावर आपोआपच साकार होतो शंभोदेवाचा अदृश्य चेहरा. एकात उमटलंय चहाच्या पेल्यातील वादळ - अगदी जसंच्या तसं.

काळ्या यमुनेच्या डोहातील गोल गोल फिरणारे भोवरे ! बघतच राहावेत असे; आणि मग एकदम वाटू लागतं की, हे फिरणं पुढे चालू होईल आणि मग आकाशगंगा का मागे राहील ? काळ्याभोर आकाशातील आकाशगंगा स्वप्नवत वाटाव्यात अशा, दुसऱ्या ठिकाणी काळ्याभोर मातीत चमकणारा सोनेरी नाग वेटोळं करून बसलाय. आता फणा हलवेल की काय तो ! एका ठिकाणी उतरलं आहे शिवलिंग आणि त्या शिवलिंगावर छत्र धरलंय प्रत्यक्ष नागराजांनी ! अजून साक्षात्कार तो काय हवा !

एका ठिकाणचे पक्षी पाहून वाटलं की, हे पक्षी भिऊन उडून चाललेत. जणू कोणीतरी त्याच्या मागेच लागलं आहे. समुद्रमंथनातून वर येणारा अमृतकलश अलगत उचलून घ्यावासा वाटतो. अनेक चित्रांतून भास होतो वेगवेगळ्या चेहऱ्यांचा. त्यात होतो स्पिरिच्युअल रिव्हॅल्यूशनचा साक्षात्कार नि मन होते मंत्रमुग्ध !

काही ठिकाणी मानसीच्या गोंडस मुलांचीही पेंटिग्ज आहेत. मुलगा पक्षिप्रेमी आहे, तर पक्ष्यांवर फोटोग्राफी करतो. पक्षी पिंजऱ्यात ठेवायला त्याला आवडत नाही. लहानपणापासून आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांतून मुलीनेही काढलेले पेंटिग्ज त्यात आहे. झाडावर एकटाच बसलेला पक्षी कोणाची तरी वाट पाहतोय. फांदीवरून दूरपर्यंत पाहतोय. का त्याच्या सादाला प्रतिसाद देत नाही कोणी ? आता हा किती वेळ वाट पाहात थांबेल की भुर्रकन उडून जाईल दूर आपल्या जोडीदाराला शोधण्यासाठी ! सापडेल ना जोडीदार त्याला ? माझ्याच मनाला हुरहूर लागली.

मोनालिसाचं काढलेलं ओरिजनल चित्र मी युरोप टूरच्या वेळी अगदी जवळून-दोन फुटांवरून पाहिले आहे. तिच्या चेहऱ्यातील व नजरेतील भाव मनात खूप भरून राहिले व अमर होत गेले. लिओ - नार्डो द व्हिन्सीचे अशी सर्वच पेंटिग्ज पाहताना मानेला कळ लागते, पण नजर हलत नाही. तीच नजर मानसीच्या पेंटीग्जवर स्थिरावली.

आपोआपच उकलत गेलेले अर्थ मनातील कमळ उमलवून गेले. फुलल्या त्यातल्या पाकळ्या नि भावना गहिवरून आल्या. प्रत्यक्ष मानसीच्या डोळ्यांमध्येच पाहताना तिचेही डोळे नकळतच भरून आले माझ्याकडे अगदी सहज पाहताना ! काय सांगत होते तिचे पाणी भरलेले डोळे मला ? की काहीच न सांगता मनातील सर्व काही सांगत होते ? आणि ह्या काहीच व्यक्त न करता येणाऱ्या भावभावनांच प्रत्यक्ष उतरल्या आहेत रंगरूपाने कागदावर ! तो कागद प्रत्यक्ष साकार करतो तिचे मन आणि त्या मनातील आभाळाला भिडणाऱ्या तिच्या चित्ररूप शृंखलांच्या सजीव कलाकृती !

मानसीची हि सर्व पेंटिग्ज पुणे येथील आमोनरा जवळील तिच्या आर्ट गॅलरीमध्ये पहायला मिळतील. त्यासाठी मानसीचा मोबाईल नं. ९९२३५९९७४३ वर संपर्क केल्यास ती स्वतः तेथे भेटू शकेल. ही पेंटिग्ज तिच्या वेबसाईट्वरही पाहायला मिळतील. वेबसाईट ऍड्रेस www.mycenttreindia.com मानसीचा ई - मेल आय डी – manasisose@gmail.com

मानसीची हि पेंटिग्ज आवर्जून पाहावीत अशी आहेत व माझ्या मनाला तर ती खूप भावलेली आहेत.

सौ . अलका दराडे नाशिक. सप्टेंबर २०१०


<< back